ठाणे (प्रतिनिधी) : सिव्हिल इंजिनीअर तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सिव्हिल इंजिनीअर अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.
तक्रारदाराने याचिकेत केलेल्या मागणीनुसार ज्या रात्री तरुणाला मारहाण झाली त्या प्रकरणातील सर्व CCTV फुटेज ठाणे महानगर दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्याचे आदेश तपास यंत्रणांना दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, ही देखील मागणी तक्रारदाराने केली आहे. त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करु. याबाबत राज्य सरकारला मुंबई हाय कोर्टानं नोटिस जारी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 30 एप्रिल होणार आहे. राज्य सरकार या सुनावणीला मुंबई हायकोर्टा नोटिसीवरआपले उत्तर सादर करणार आहे, अशी माहिती सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी दिली आहे.
ठाण्यात 5 एप्रिलला अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनीअर तरुणाला मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून त्यांच्या समक्ष त्यांच्या अंगरक्षकांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली होती, अशी तक्रार अनंत करमुसे यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते अशा एकूण 5 जणांना अटक करुन कोर्टात हजर केले होते. यानंतर अनंत करमुसे या तक्रारादारांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सोबत राज्यपालांचीही भेट घेतली होती.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांच्या बंगल्यावर नेऊन आव्हाड यांच्या समक्ष मारहाण केली, अशी तक्रारदार ठाण्यातील एका सिव्हिल इंजिनीअर तरुणाने केली होती. 5 एप्रिलला रात्री दिवे लावावेत या पंतप्रधान मोदींच्या आवहानानंतर जिंतेंद्र आव्हाड यांनी त्याला विरोध करत प्रतिक्रिया दिली होती.
त्यानुसार अनंत या तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्याचा राग मनात धरुन 5 एप्रिलच्या रात्री 11.50 च्या सुमारास दोन पोलिस या तरुणाच्या घरी आले आणि पोलिस स्टेशनला तुम्हाला बोलवलं आहे, असं सांगून जितेंद्र आव्हाडयांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेलं आणि तिथे 15-20 जणांनी लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत या अनंत करमुसे यांना मारहाण केली. यावेळी जितेंद्र आव्हाड स्वत: उपस्थित होते. त्यांनी मला ती पोस्ट डिलीट करायला लावली. नंतर मी ही पोस्ट चुकून केली, त्याबद्दल माफी मागतो, असा व्हिडिओ माझ्याकडून रेकॉर्ड करुन घेतला, अशी तक्रार या अनंत करमुसे यांनी पोलिसांत दिली होती. यानुसार वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.